हा व्यर्थ जन्म तव गेला!
- Aarti Manjarekar
- Sep 28, 2023
- 1 min read
सागरा पहाया गेला, ना तुषार अंगी ल्याला
कोरडाच परतून आला, हा व्यर्थ जन्म तव गेला
मोती शेतात पिकविला, धान्याचा कणगा भरला
पण मजूर उपाशी मेला, हा व्यर्थ जन्म तव गेला
शक्तीचा उपासक झाला, जागर देवीचा केला
उदरीच मारिले स्त्रीला, हा व्यर्थ जन्म तव गेला
वेदांना कोळून प्याला, पंडित दशग्रंथी झाला
त्यागीले मायबापाला, हा व्यर्थ जन्म तव गेला
मुखी धरीले हरिनामाला, परी हृदयी हलाहलाला
न पार दगा- कपटाला , हा व्यर्थ जन्म तव गेला
विठुराया चरणी आला, दानधर्म उदंड केला
अभिमान चित्ती दाटला , हा व्यर्थ जन्म तव गेला
आरती मांजरेकर
२८ सप्टेंबर २०२३




Awesome,💯👏👏👏