आज माझ्या बागेत…
- Aarti Manjarekar
- Oct 3, 2023
- 1 min read
सळ सळ सळ प्राजक्तामधुनी
उन म्हणाले सोनसळी
या उठा फुलांनो खेळू आजही
रोजसारखी पळापळी
पाकळीची उमलून पापणी
हळूच एकदा पहा तरी
चौफेर फाकले रश्मिकर,
लोपली नभी अन् विभावरी
रवि किरणांनी नभा व्यापीले
गुलबक्षी तरी निजलेली
वेलीवरूनी टकमक बघती
जुई सायली आणि चमेली
गवतातुनी मग नाचत आली
नाजुक पिवळी पाकोळी
चकित होऊनी म्हणे कुसुमांनो
पेंग कशास्तव यावेळी
सवंगड्यांची करीत प्रतीक्षा
कधीचा जागा पारिजात हा
सकाळ मोहक जतन कराया
हृदयामध्ये, सुचवी पहा
अन् आज अचानक कुठून कशी,
शिंपीण आली बागेत
भिरभिर भिरभिर फिरूनी शोधते
काही पाना-पानात
उठा कुसुमांनो बोला डोला,
गंध पसरवा अलवार
पिलास्तव ती बांधील घरटे
करू द्या तिज सुखसंचार
आरती मांजरेकर
३ ऑक्टोबर २०२३




Khup mast